
पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची संपली का दादागिरी..?
अकेला देवेंद्र क्या करेगा?, असा सवाल करून भाजपला हिणवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना 360 अंशांनी फिरून सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच “ॲक्टिव्ह” दिसतात, याची कबुली द्यावी लागली.
याचा अर्थ शरद पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची संपली का “दादागिरी”?, या सवालाचे उत्तर द्यायची वेळ त्यांनी स्वतःवर आणली. पण हा सवाल त्यांना कोणी केला नाही.
पण मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हेच ऍक्टिव्ह दिसतात याची कबुली काही आजच इंदापूर मध्ये सुप्रिया सुळे यांनी दिली असे नव्हे, त्याआधी देखील त्या असेच बोलल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डिवचण्यासाठी त्यांनी त्यावेळी ते वक्तव्य केले होते, पण म्हणून सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातली वस्तुस्थिती लपून राहत नाही. अगदी संतोष देशमुख आणि परभणी प्रकरणापासून ते दावोस दौऱ्यापर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस “ऍक्टिव्ह” राहिले, ही वस्तुस्थिती फक्त सुप्रिया सुळे यांना एकटीलाच दिसलेली नाही. ती सगळ्या महाराष्ट्राला दिसली. उलट सुप्रिया सुळे यांना मात्र फडणवीस ऍक्टिव्ह राहिले याचीच कबुली द्यावी लागली. हे पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्या नेत्याची “दादागिरी” संपल्याचे लक्षण आहे.
पहाटेच्या शपथविधी वरून खर्गे – पवार वाद; पण कुणी कुणाचा, का केला विश्वासघात?
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड कनेक्शन लागल्याबरोबर अजित पवार त्या प्रकरणापासून नामानिराळे राहिले. ते खासगी परदेश दौऱ्यावर निघून गेल्याच्या बातम्या आल्या. त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून “ॲक्टिव्ह” राहिले. त्यांनी वेगवेगळ्या खात्यांच्या बैठकांचा सपाटा लावला होता. प्रत्येक खात्याला 100 दिवसाचा प्लॅन आखायचे आदेश दिले होते. याच कालावधीत किमान दोनदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या आल्या. सुरुवातीला खाते वाटपावरून आणि नंतर पालकमंत्री वाटपावरून त्यांची नाराजी उघड दिसली, पण म्हणून फडणवीसांच्या “ऍक्टिव्हिजम” मध्ये कुठलीही कमतरता राहिलेली नव्हती. उलट त्याच कालावधीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी संपूर्ण मंत्रिमंडळावर आणि सरकारवर आपला फेरवचक बसवण्याचे काम केले. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात 16 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले.
त्याच दरम्यान भाजपने शिर्डीत महाअधिवेशन भरवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक दृष्ट्या मोठे पाऊल टाकले. त्याची छोटी कॉपी नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मारली. पण त्या पलीकडे अजित पवारांची कुठलीच “दादागिरी” अजून तरी मंत्रिमंडळात दिसली नाही.
काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळात अजित पवारांची प्रचंड “दादागिरी” चालायची. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री अशोक चव्हाण असोत, की पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा “दादागिरी” करायचे. आपल्याला हवे ते विषय मंजूर करून घ्यायचे. पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ती “दादागिरी” आता चालेनाशी झाली, हेच तर सुप्रिया सुळे यांना सुचवायचे नाही ना!, असा सवाल या निमित्ताने समोर आला.
– राष्ट्रवादीत पक्षप्रवेशावर भाजपची “मेख”
दरम्यानच्या काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीत सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची तयारी दिसली, पण तिथे देखील भाजपने अशी “मेख” मारून ठेवली, की अजितदादांना स्वतंत्रपणे राष्ट्रवादीतल्या पक्षप्रवेशाचा देखील निर्णय घेता येऊ नये. त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांशी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करावी लागेल. कारण महायुतीत भविष्यात अडथळा ठरू शकतील अशा कुठल्याच नेत्यांना कुठल्याच पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय भाजपने घेतला. याचा अर्थ अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला देखील भाजपने “फिल्टर” लावून ठेवला.
एक प्रकारे महाराष्ट्राचे राजकारण 360° फिरल्याचे हे लक्षण आहे, जे सुप्रिया सुळे यांच्या काही प्रमाणात लक्षात आले आहे म्हणूनच एकटे फडणवीसच “ऍक्टिव्ह” दिसतात, याची कबुली त्यांना द्यावी लागलेली दिसते.