
खिलाडीला ७५% पेक्षा जास्त झाला नफा
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘स्काय फोर्स’ या नवीन चित्रपटाच्या रिलीजमुळे चर्चेत आहे. पण सध्या अक्षयने त्याचे मुंबईतील अपार्टमेंट ४.२५ कोटी रुपयांना विकून सगळ्यांना आश्चर्य चकित केलं आहे.
स्क्वेअर यार्ड्सच्या अहवालानुसार, बोरिवली पूर्व मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटची विक्री त्याने २१ जानेवारी २०२५ रोजी केली आहे.
२५ एकरच्या विस्तीर्ण जागेवर बांधलेले हे अपार्टमेंट ओबेरॉय स्काय सिटीमध्ये आहे. हे ३ बीएचके डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट १,०७३ चौरस फूट (९९.७१ चौरस मीटर) क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्यात दोन पार्किंग स्लॉट आहेत. या व्यवहारासाठी २५.५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
अक्षय कुमारने त्याचे अपार्टमेंट विकले
अक्षय कुमारने नोव्हेंबर २०१७ मध्ये हे अपार्टमेंट सुमारे २.३८ कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि यावेळी विक्रीत अपार्टमेंटच्या किमतीत ७८% वाढ झाल्याचे वृत्त आहे. सध्या या अपार्टमेंटची किंमत प्रति चौरस फूट ३९,५२२ रुपये आहे.
दरम्यान, अक्षय हा एकमेव बॉलिवूड स्टार नाही ज्याचा या ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अपार्टमेंट आहे. अनेक मोठ्या सेलिब्रिटींमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची नावे देखील समाविष्ट आहेत. २०२२ च्या सुरुवातीला, अक्षयने मुंबईतील अंधेरी पश्चिमयेथील त्याची एक प्रॉपर्टी डब्बू मलिकला ६ कोटी रुपयांना विकल्याचे वृत्त आहे.