
पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!
महाराष्ट्र विधानसभेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) “तब्बल” 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांनी म्हणे “मोठ्ठा डाव” टाकलाय. पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांना तो डाव पटतचं नाय, अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
मूळात महाराष्ट्र विधानसभेत कुणाला विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी विरोधी बाकांवरची संख्याच नाही. सगळे विरोधक आवश्यक संख्या गाठण्यात तोकडे पडले. पण म्हणून कुणी विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसायची खुमखुमी सोडलेली नाही. या खुमखुमीतूनच म्हणे शरद पवारांनी विरोधी पक्षनेते मिळवायचा “मोठ्ठा डाव” टाकलाय.
शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची एकत्र आमदार संख्या दाखवून प्रत्येक पक्षाला दीड वर्षे विरोधी पक्षनेते पद द्यायचा फॉर्म्युला म्हणे पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या गळ्यात मारण्याचा डाव आखला आहे. यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापेक्षा पवारांच्याच पक्षाचा लाभ मोठा आहे. म्हणजे फक्त 10 आमदार असूनही त्यांच्या एखाद्या आमदाराच्या गळ्यात दीड वर्षांसाठी विरोधी पक्षनेते पदाची माळ पडायची पवारांना अपेक्षा आहे.
पण हे सगळे पवारांच्या मनातले मांडे आहेत. पण काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अद्याप पवारांच्या फॉर्म्युलाला मान्यता दिलेली नाही. कारण शिवसेनेकडे 20 आमदार, तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. त्यामुळे असलाच, तर विरोधी पक्षनेतेपदावर फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे पवारांनी “मोठ्ठा डाव” टाकूनही विरोधी पक्षांचे राजकारण अजून तरी शिजत नाही