
पटोलेंनी सुनावलं, दरवाढीला तीव्र विरोध
राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता एसटी दरवाढ करून सर्वसामान्यांना लुटण्याचा यांचा डाव असल्याची टीका पटोले यांनी केली.
प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि भाडेवाढ करता?
एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे, पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही, शिवशाही नावाने सुरु केलेल्या बससेचीही दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे, असे पटोले म्हणाले.
भाडेवाढीसंबंधी परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही, त्यांनी पदावर कशाला राहावे?
एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक असल्याचे पटोले म्हणाले.
एसटी महामंडळ भ्रष्टाचाराचा अड्डा, भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज नाही
ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील १३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही पटोले म्हणाले.