
का ते जाणून घ्या..!
रणजी स्पर्धेत मुंबई संघात दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबईला जम्मू काश्मीरने पराभूत केलं. त्यामुळे रणजी स्पर्धेत पुढचा सामना काहीही करून मुंबईला जिंकावा लागणार आहे.
हा सामना मेघालयविरुद्ध असून करो या मरोची लढाई आहे. जम्मू काश्मीर विरूद्धच्या सामन्यात पराभव झाला आणि सर्वच गणित बिघडलं आहे. गतविजेत्या मुंबई संघाचा 30 जानेवारीला मेघालयशी सामना होणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईला आता मेघालय विरुद्ध बोनस गुणांसह मोठा विजय मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे, बडोदा संघाने जम्मू काश्मीर संघाला पराभूत करणं तितकंच आवश्यक आहे. असं असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी इलीट ग्रुप ए सामन्यासाठी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल संघात नसल्याने आयुष म्हात्रेला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार आहे. कारण त्यांच्या गैरहजेरीत मुंबईसाठी त्याने ओपनिंग केलं आहे. पण मागच्या सामन्यात दिग्गज खेळाडू असल्याने वगळण्यात आलं होतं.
संघात अंगकृष रघुवंशी, सूर्यांश शेडगे आणि अथर्व अंकोलकर यांचं पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे, जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असलेल्या कर्श कोठारीला संघात स्थान मिळालेलं नाही. दरम्यान, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा 6 फेब्रुवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी झाले आहेत. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होणार आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. दुसरीकडे, शिवम दुबे टी20 मालिकेसाठी भारतीय संघासोबत आहे. त्यामुळे त्याचीही संघात निवड झाली नाही. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात शिवम दुबे शून्यावर बाद झाला होता.
मुंबईची 16 सदस्यीय टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सिद्धेश लाड, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, श्रेयस गुरव आणि अथर्व अंकोलकर.