
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी माहिती समोर!
खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची न्यायालयीन कोठडी एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची वाढणार असल्याची शक्यता आहे.
तपासी यंत्रणांनी पोलीस कोठडी मागितली नसेल तर न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीची दर 14 दिवसांनी पोलीस कोठडी ही एक्सटेंड होते. तपासी यंत्रणांकडून आरोपीच्या पोलीस कोठडीची आज मागणी केलेली नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे.
वाल्मीक कराडची न्यायालयीन कोठडी वाढणार?
तपासी यंत्रणांच्या अधिकृत सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे. न्यायालयाच्या रुटींग प्रोसेसप्रमाणे आज वाल्मीक कराड याची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची 9 डिसेंबरला केज तालुक्यात निर्घृणपणे हत्या झाली होती. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन ही हत्या झाली, असा आरोप झाला होता. अशातच आता वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप
बीड विशेष न्यायालयाकडून 22 जानेवारी रोजी कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. पण आज या कोठडीची मुदत संपत आहे. अशातच कराडला आज कोर्टात हजर न करताच त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच गेली दोन महिने आरोपी फरार आहे. यात जर काही पुरावे नष्ट करण्यात आले तर त्यांची जबाबदारी ही यंत्रणा आणि प्रशासनाची असेल असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांचा धक्कादायक आरोप
दरम्यान, फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठेही गेलेला नसून त्याला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आपल्या भेटीला आले होते, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला होता. रात्री 2 वाजता ते माझ्या भेटीला आले, त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता. त्यांनी कराडची ओळख करून दिली आणि मला सांभाळून घेण्याची विनंती केली, असं जरांगे यांनी म्हटलं होतं.