
बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचे राज्यभर अलर्ट देण्यात आले आहे. या संदर्भात नाशिक पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये पुणे आणि नाशिक शहरात एका एजंटचे प्रदीर्घकाळ वास्तव्य असल्याचे उघड झाले आहे.
नाशिक शहरातील आडगाव भागात सुरू असलेल्या बांधकाम साइटवर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये आठ बांगलादेशी नागरिक ताब्यात घेतले आहेत. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत माहिती दिली.
गेले काही दिवस जिल्ह्यातील मालेगाव येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते. या संदर्भात बनावट कागदपत्रांमुळे तीन नागरिकांवर मालेगाव मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसीलदारासह काही जणांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांना आज मोठे यश मिळाले. आडगाव भागातील एका बांधकाम साइटवर सहाशे मजूर काम करीत होते. येथे बांगलादेशी मजूर असल्याची माहिती मिळाल्याने गेले चार दिवस वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह वेषांतर करून या ठिकाणी रेकी करीत होते.
या कारवाईत त्यांना मोठे यश मिळाले. यामध्ये पोलिसांना पुणे शहरात बारा वर्षांपासून वास्तव्य असलेल्या एजंटची माहिती मिळाली. त्याद्वारे त्यांना अन्य सात बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी आणि चव्हाणके यांनी श्री पठाण, श्री वाघ, श्रीमती जाधव या सहकाऱ्यांसह वेषांतर केले होते. त्यांनी येथे पाळत ठेवली होती.
पठाण वाघ श्रीमती जाधव आदींनी मजूर म्हणून येथे वेषांतर करून काम केले. त्यानंतर त्यांना या आठ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बाबत पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.
यासंदर्भात तीन जणांकडे भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याचे आढळले आहे. संबंधित बांगलादेशी प्रामुख्याने मजुरीसाठी आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे असलेल्या बांगलादेशी ओळखपत्र व अन्य कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे. त्यांना भारतीय कागदपत्र कसे उपलब्ध झाली आणि कोणी करून दिली, याचा तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईसाठी अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकसह विविध शहरातील पोलीस याबाबत काम करीत आहेत. मात्र नाशिकच्या पोलिसांना यामध्ये मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे यातील एक एजंट गेली बारा वर्षे पुणे शहरात राहून असे मजूर उपलब्ध करून देण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा अन्य कोणाशी संबंध आहे का किंवा अन्य किती बांगलादेशी नागरिक त्यांच्या संपर्कात आहेत याचा शोध घेतला जात असल्याचे, पोलीस आयुक्तांनी सांगितले.