
पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता.
आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता तेव्हापासूनच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज सुभाष झांबड यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2006 ते 2023 दरम्यान अजिंठा अर्बन बँकेत 97 कोटी 41 लाख रुपयांच्या घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर सीटीचौक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ऑक्टोबर 2023 मध्ये दाखल असून दुसरा गुन्हा हा नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवण्यात आला आहे.
माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक
पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सुभाष झांबड अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय आणि औरंगबाद खंडपीठात झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते. शहरातील अनेक भागात तसेच अनेक सोहळ्यांमध्येही ते दिसून आले होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेला ते सापडलेच नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आज सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अटकपूर्व जामिनासाठीचा विशेष अर्ज घेतला होता मागे
दरम्यान, माजी आमदार सुभाष झांबड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला विशेष अर्ज मागे घेतला होता. तत्पूर्वी झांबड यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि सुधांशू जोशी यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करायचा असल्याने हा अर्ज मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. सुनावणीवेळी न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांनी अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली होती.