
चौघांना अटक उत्तर प्रदेश कनेक्शन काय ?
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडू वादात विशेष तपास पथकाने चार जणांना अटक केली आहे.
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे उघड झाल्यानंतर देशभरात भाविकांचा रोष दिसून आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आले. त्याच पथकाने वेगवेगळ्या डेअरीशी संबंधित असलेल्या परंतू मंदिरात प्राण्यांची चरबी असलेले तूप पुरवण्यात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे.
श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने चार जणांना अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भोलेबाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरच्या अपूर्व चावडा आणि एआर डेअरीच्या राजू राजशेखर या चौघांना अटक करण्यात आली आहे. यामधील काही लोकांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने रविवारी रात्री उशिरा सांगितले की, दोन व्यक्ती म्हणजे बिपिन जैन आणि पोमिल जैन हे भोलेबाबा डेअरीमधील आहेत. अपूर्व चावडा वैष्णवी डेअरीशी संबंधित आहे. राजशेखरन एआर डेअरीशी संबंधित आहेत. एसआयटीच्या चौकशीत तूप पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनियमितता उघडकीस आली आहे. ज्यामुळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर आरोप आहे की, वैष्णवी डेअरीच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला तूप पुरवण्यासाठी एआर डेअरीच्या नावाने निविदा मिळवल्या आणि निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी बनावट रेकॉर्ड तयार करण्यातही त्यांचा सहभाग होता.
विशेष तपास पथकात पाच सदस्य सूत्रांनी सांगितले की, एसआयटीने उघड केले की वैष्णवी डेअरीने भोले बाबा डेअरीकडून तूप खरेदी केल्याचा खोटा दावा केला होता. तर तपास करताना अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, भोलेबाबा डेअरीकडे मंदिर मंडळ तिरुमला तिरुपती देवस्थानमची मागणी पूर्ण करण्याची क्षमता नाही. तिरुपती लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ५ सदस्यांची एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीमध्ये केंद्रीय संस्थेचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश पोलिसांचे दोन अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा एक अधिकारी यांचा समावेश आहे.