
प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा काढण्याचे आदेश !
येत्या 19 फेब्रुवारीला राज्यात शिवजयंती कशी साजरी करायची यासंदर्भात केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवले आहे. यात शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘जय शिवाजी जय भारत’ पद यात्रा काढण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे.
याबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सकाळी 7.30 वाजता व्हर्च्युअल या पद यात्रेच उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8.30 वाजता पदयात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
पुढे आलेल्या माहितीनुसार, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेमध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. तसेच या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया पुण्यामध्ये उपस्थित राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. दरम्यान, यंदाची छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांची लष्करी हुशारी आणि आदर्श कारभार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले आहे.
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम 90% टक्के पूर्ण
बहुचर्चित मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती तलवार धारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर उत्तर प्रदेश मधील नोएडा येथून शिव पुतळ्याच्या खालील खडकरुपी बेस आणण्यात आला आहे. मालवणच्या सागरी महामार्गावर अवाढव्य असणारे हे तीनही बेस उतरविण्यात आले आहेत. सहा दिवसांपूर्वी नोएडा येथून श्री राम सुतार आर्ट क्रीएशन यांच्या कंपनीतून हे पार्ट निघाले होते. ३० बाय ३० फूट लांबीचे हे पार्ट असून शिवपुतळा उभारण्यासाठी जो चौथरा उभारण्यात आला त्या चौथऱ्याच्या बाजूला हे तिन्ही भाग लावण्यात येणार आहे. त्यामुळे शिवराय एका खडकावर उभे राहून समुद्राच्या दिशेने पाहताना दिसणार आहेत.
शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण
पुण्यातील आंबेगाव येथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसरा टप्पा देखील भव्य असा निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, लोहगडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तर प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचे कुलदैवत तुळजाभवानी मातेचे हुबेहूब मंदिर तयार करण्यात आलं आहे.
नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा झाल्यावर शिवसृष्टीचा दुसरा टप्पा शिवप्रेमीसाठी खुला केला जाणार आहे. 21 एकरवर असणाऱ्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे देखील काम सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली आहे.