
सकाळपासून ठेवीदारांच्या रांगा, ‘या’ बँकेत तुमचं आहे का खाते…
मुंबईतील एका बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निर्बंधामुळे एकच गोंधळ उडाला. आरबीआयने रात्री निर्बंध लागू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज सकाळपासून बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली.
अनेकांची आयुष्यभराची कमाई बँकेतच असल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. कांदिवली येथील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध घातली आहेत.
आरबीआयच्या सूचनेनुसार, या बँकेतील खातेदाराला आपल्या खात्यातून कमाल 5 लाख रुपयेच काढता येणार आहे. त्याशिवाय, लॉकरमधील वस्तू काढण्याची मुभा आरबीआयने दिली आहे.
आज सकाळपासूनच रांगेत असलेल्या एका महिला खातेदाराने सांगितले की, आम्ही कालच बँकेत काही रक्कम जमा केली होती. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत आम्हाला काहीही सांगितले नाही. आता, आम्हाला तीन महिन्यात खात्यातील रक्कम मिळेल असे सांगण्यात येत आहे. आम्हाला कर्जाचे हप्तेदेखील भरायचे आहेत. आता पुढं कसं होणार, याची चिंता लागली असल्याचे खातेदारांनी सांगितले.
आरबीआयने बँकेवर निर्बंध का लावले ?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. मागील दोन वर्षांपासून बँकेला आर्थिक तोटा होत असल्याने आरबीआयने कठोर पावले उचचली आहेत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला मार्च 2024 मध्ये 22.78 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर, 2023 मध्ये 30.75 कोटींचा तोटा झाला होता. बँकेवर 6 महिन्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बँकेवर आरबीआयचे कोणते निर्बंध ?
बँक आता नवीन कर्ज देऊ शकत नाही. ग्राहक या बँकेत नवीन मुदत ठेव (FD) किंवा इतर कोणतीही ठेव योजना उघडू शकणार नाहीत. बँकेत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवरही बंदी आहे. ग्राहक आपल्या खात्यातून फक्त 5 लाख रुपये काढू शकतो. बँकेला कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे, वीज बिल आदीसारख्या खर्चास मंजूरी आहे. सध्या बँकेवर 6 महिन्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहे.