
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितलं !
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीवर महत्वाचे भाष्य केले आहे. राज्यातील ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती राज्य शासनाने दिली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय झाल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी बोलताना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेनंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. निर्णय आल्यानंतर लवकरच निवडणूका घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीचचाच विजयी होईल,’ असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, विरोधक काहीही म्हणाले तरी आमचे सरकार योजना बंद करणारे नसून नवनविन योजना अंमलात आणणारे सरकार आहे. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. जे पात्र नाहीत किंवा ज्यांना योजनेच्या लाभाची आवश्यकता नाही, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.