
शंभूराजेंबद्दल गरळ ओकणाऱ्या KRK विरुद्ध मनसे आक्रमक…
स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर असलेल्या वादग्रस्त माहिती योग्यच असल्याचा दावा अभिनेता कमाल खानने केला आहे.
कमाल खानने या वादग्रस्त मजकुराचं समर्थन करत या मजकुराचा स्क्रीनशॉट शेअर केला. यावरुन मोठा वाद निर्माण झालेला असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणात उडी घेतली आहे. मनसेनं या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया नोंदवताना छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कमाल खानला फाशी देण्याची मागणी केली आहे.
वादात मनसेची उडी
कमाल खान याने समाजमाध्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्यावर जी पोस्ट केली आहे. त्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केल्या जात आहे अशा विकृतांवर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे, असं मनसेनं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.
…तर मनसे स्टाइल समज
“हे विकृत मनोवृत्ती दर्शन आहे आणि अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होत असेल तर अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे, असं अभ्यंकर यांनी म्हटलं आहे. “जर शासनाने याची दाखल घेतली नाही तर मनसेकडून मनसे स्टाइलने त्याला समज देण्यात येईल,” असं अभ्यंकर म्हणाले आहेत.
मिळेल तिथे फटके मारा
विकिपीडियावर शंभूराजेंबद्दल जी भाषा वापरली त्याचा निषेध मी केला आहे. अशांना रस्त्यावर फिरवून न देता मिळेल तिथे फटके मारले पाहिजे. सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सरकारने अशी कारवाई करावी की पुन्हा कोणी…
माजी खासदार समीर भुजबळ यांनी कमाल खानबद्दल बोलताना, “असे वक्तव्य करणे हे दुर्दैव आहे. सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील पोलिसांना या बद्दल कारवाई करण्यास सांगितलं आहे. मात्र असे वक्तव्य सर्वांनी टाळले पाहिजे. सर्व जगातील जनतेला महाराजांबद्दल आदर असताना असे काही वक्तव्य वातावरण दूषित करण्यासाठी केली जातात हे अत्यंत निंदनीय आहे. सरकारने अशा व्यक्तींवर कडक कारवाई करायला हवी जेणे करून पुन्हा कोणी असे वक्तव्य करू नये,” असं म्हटलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमाल खान आणि विकिपिडियावर कारवाई करण्याची मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.