
शिंदेंना धक्का विरोधकांचाही हिरमोड होणार…
निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असले तरी सत्ता वाटपाच्या मुद्यावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या सरकारमध्ये खाते वाटपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तर, दुसरीकडे आता महायुतीमध्ये अजित पवारांचे वजन वाढणार असल्याचे चित्र आहे. राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्षपद हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे. आता, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. विरोधकांकडूनही सभागृहाची परंपरा म्हणून उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. आता, मात्र अजित पवारांचा आमदार उपाध्यक्ष होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजकुमार बडोले यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडून सत्तेतील समतोल साधण्यासाठी उपाध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आमदार राजकुमार बडोले यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकुमार बडोले हे भाजपमध्ये होते. या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
विरोधी पक्षनेते पदाचा सस्पेन्स कायम…
सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष हा धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, राज्यातील शेती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरही विरोधक आक्रमक होणार आहेत. तर, दुसरीकडे राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचा आमदार विरोधी पक्षनेता होणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.