
रोहित शर्माच्या शाळेवर म्हाडाची तोडक कारवाई, दिनेश लाड यांचे गंभीर आरोप…
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बोरिवलीच्या गोराई येथील अल्मा माटर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावार म्हाडाने कारवाई केली आहे.
म्हाडाच्या मालकीच्या या मैदानावर उभारण्यात आलेले क्रिकेट टर्फ आणि फुटबॉल नेट म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून तोडण्यात आले आहे. शाळेकडून या जागेचा ‘व्यावसायिक फायद्यासाठी’ वापर केला जात असल्याचा म्हाडाचा आरोप आहे. बुधवार आणि गुरुवारी ही कारवाई करण्यात आली होती.
जागेचा व्यावसायिक वापर ?
रोहितचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड गेल्या 29 वर्षांपासून या मैदानावर विद्यार्थ्यांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देत होते. एसवीआयएस शाळेच्या मुख्याध्यापिका संदीप गोनोकिया यांनी या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप फेटाळला आहे. म्हाडाने पोलिसांच्या मदतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत या आठवड्यात शाळेतील क्रिकेट नेट हटवण्यात आले.
प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले…
प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले, मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पाडकाम थांबवण्याची आणि शाळेला समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ती दखल घेतली नाही या मैदानातून जवळपास 100 चांगले क्रिकेटपटू घडले आहेत. आता नेट्स तोडल्यामुळे फुटबॉल आणि क्रिकेटच्या सरावात व्यत्यय येणार आहे. आणि मुले खेळू शकणार नाहीत, असं मत प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केले. लाड पुढे म्हणाले की, सुमारे ६० विद्यार्थी या सुविधेचा क्रिकेट सरावासाठी वापर करत होते, तर काही फुटबॉल खेळत होते. या कारवाईमुळे क्रिकेट खेळपट्टीला थेट नुकसान झालं नसलं, तरी फुटबॉल मैदान उद्ध्वस्त झाल्यामुळे क्रिकेट सराव आणि क्षेत्ररक्षणाच्या कवायतींवर मोठा परिणाम होणार आहे.
मुख्याध्यापिकांकडून आरोपांचे खंडन
दरम्यान, एसवीआयएसच्या मुख्याध्यापिका गोणक्य यांनी आरोपांचे खंडन केलं आहे. क्रीडा मैदानाचा कोणताही व्यावसायिक वापर होत नाही. भाडेपट्ट्याची मुदत संपत असल्याची सूचना आधीच देण्यात आली होती, परंतु आम्ही नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असताना, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई केली, त्यावेळी मुले मैदानावर उपस्थित होती,असं मुख्याध्यापिका गोणक्य यांनी म्हटलंय.