
फक्त बेडूक उड्या मारल्या संजय राऊतांचा खोचक टोला…
सत्ता स्थापन झाल्यापासून महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये घेतलेले काही अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलले आहेत
यावरून महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ‘भाजपनं एकनाथ शिंदे यांचे पंख छाटले आहेत का?’ असा प्रश्न विचारले असता, ‘एकनाथ शिंदे यांना पंख नव्हतेच, ते फक्त उड्या मारायचे’, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. ‘एकनाथ शिंदेंना कधी पंखच नव्हते. ते फक्त उड्या मारायचे. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरूड झेप घेतो. अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे’, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदेंना राजकीय धक्का
महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलंय. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजय अशरवर निशाण साधलाय.
शिवसेना पक्ष ३ वर्षांपूर्वी फोडण्याचा प्रयत्न झाला. आमदारांना विकत घेण्यासाठी आणि पैशांची देवाण घेवाण करणयामध्ये अजय अशर होता. आमदारांना विकत घेण्यासाठी अजय अशर, भाजपचे खासदार, सुरतचे खासदार आणि मुंबईतले काही ठेकेदार या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. अजयनं हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी देश सोडला आहे, त्यांनी पलायन केले आहे’, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.