
घरात सापडलेलं घबाड पाहून अधिकारी-कर्मचारी हैराण…
बीड: बीड जिल्ह्यातल्या शिरुरमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या या गुंडाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला होता. खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे
या सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलं आहे.
जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या नेतृत्वात 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खोक्या घरावर आज धाड टाकली. या धाडीत खोक्याच्या घरातून धारदार शस्त्र, जाळी, वाघुर आणि बरंच काही शिकारीचं सामना जप्त करण्यता आलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे वन्यजीवांच्या प्राण्यांचे मांस देखील येथे आढळले आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. वनविभागने कारवाई केली असली तर अधिकाऱ्यांना उशीरा जाग आल्याने वन्यजीवप्रेमींनी संतापही व्यक्त केला आहे.
सतीश भोसलेने शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केला होता. जवळपास 200 हून अधिक हरीण आणि काळवीट सतीश भोसलेने मारले आहेत. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाठ यांनी केला आहे.
कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या?
भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येत आहे. एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एन्ट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आलेत.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हॅलिकॉप्टरने एन्ट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.