
संजय राऊतांचा सनसनाटी दावा…
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी दावा केलाय.
संजय राऊत म्हणाले की, धंगेकरांनी एका पक्षात प्रवेश केला. ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. पण, त्यांनी जे सांगितले की विकासकामे होत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. म्हणून मी शिंदे गटात जात आहे. मला कळत नाही की, शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातले किंवा त्यांच्या कसबा पेठेतली कोणती विकास कामे मार्गी लागणार आहेत? त्यांनी एखाद्या हॉस्पिटलचे प्रपोजल दिले आहे, ते थांबलं आहे का? की शैक्षणिक, आरोग्यविषयक किंवा इतर काही समाजोपयोगी कामं असतात ते थांबलेली आहेत, त्यासाठी ते चालले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपमध्ये जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी सुरू आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटी पक्षांतर केले. अजित पवारांनी भीतीपोटी पक्षांतर केले. आमच्याकडून भारतीय जनता पक्षात गेलेल्या लोकांनी देखील भीतीपोटी पक्षांतर केले, असे त्यांनी म्हटले.
प्रतिभा धंगेकरांच्या जागेवर भाजपने वक्फ बोर्डाचा दावा केला
संजय राऊत पुढे म्हणाले की, एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केले जाते आणि त्याच्यावर काही जुनी प्रकरणे असली तर त्याच्यावर दबाव टाकला जातो, ही एक सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे. रवींद्र धंगेकर खरोखर का गेले? हे खरंतर त्यांनी त्यांचे जे कोणी दैवत असेल त्यांना स्मरून सांगायला पाहिजे की, मी खरोखर विकासकामांसाठी गेलो. कसबा मतदारसंघात एक जागा आहे. ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत साधारण 60 कोटी रुपये आहे, असे म्हणतात. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही जागा वक्फ बोर्डाची आहे असे सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले होते. त्यांचे काम अडवण्यात आले, त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. त्यामुळे प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली.
आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले
हे सगळं वातावरण तयार करण्यात आला, जेणेकरून रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडावा. शेवटी एका मराठी माणसाने गुंतवणूक केलेली आहे. आश्चर्य असे आहे की, त्यांच्या सोबतचे इतर दोन पार्टनर हे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत, असे माझे माहिती आहे. या व्यवहारात मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नी देखील आहे. इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांची कोंडी करण्यात आली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल, अशी त्यांना भीती वाटली. त्या भीतीपोटी विकासकामे रखडले आहेत, या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.