
पाण्याचं टेन्शन कायमच मिटणार – उद्योगमंत्र्यांची घोषणा
मुंबई: इचलकरंजी शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पंचगंगा आणि कृष्णा नदीतून 45 दललिटर (MLD) पाणी उपसा केला जात आहे. तसेच, जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाइन बदलण्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.
यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य राहूल आवडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
याबाबत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, कृष्णा नदी मजरेवाडी उद्भव योजना शहरापासून 18.33 किमी वर सन 2001 पासून आहे. पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन जुनी झाल्याने वारंवार गळती होत होती. त्यामुळे तीन टप्प्यात पाईपलाइन बदलण्याचे काम सुरू असून, त्यासाठी 54.56 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत 18.335किमी पाईपलाइन पैकी16.40 किमी पाईपलाइन बदलण्यात आली आहे, तर उर्वरित 1. 935 किमी काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेकडून 45 MLD पाणी उपसा करून शहरातील नागरिकांना नियमित पुरवठा करण्यात येईल.
इचलकरंजी शहराची भविष्यातील पाणीपुरवठा गरज लक्षात घेऊन केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत दूधगंगा नदी (सुळकुड उद्भव) येथून नवीन पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 160.84 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध होता तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली, या समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही सुरू असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.