
पदरात काय पडले ? अशांतता आणि गोंधळ…
राज्यातील राजकीय परिस्थिती वरचेवर अशांत होत चालली आहे, राजकीय गोंधळ वाढू लागला आहे. सत्ताधारी महायुतीतील पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. तपास यंत्रणांची भीती दाखवून भाजप विरोधी पक्षांतील नेत्यांना जेरीस आणतो, असा आरोप पुन्हा एकदा झाला आहे.
घटनात्मक पदावर बसलेले नेते राज्यघटनेला स्मरून घेतलेली भेदभाव न करण्याची शपथ विसरून अराजकता निर्माण करू लागले आहेत. दररोज कुठेतरी गुंडगिरी, गंभीर गुन्हेगारीचे प्रकार उघडकीस येत आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासानांची पूर्तता महायुती सरकारला करता आलेली नाही.
महायुतीला प्रचंड बहुमत देऊन महाराष्ट्राच्या पदरी अशांतताच पडली आहे. राज्यात अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष वळवण्यासाठी दोन धर्मांत फूट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, लाडकी बहीण योजनेतील महिलांचे मानधन दरमहा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार, अशी आश्वासने महायुतीने दिली होती. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या दोन्ही आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत विजयी झालेले आणि पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झालेले रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने त्रास दिला, त्यामुळे पक्षांतर करावे, लागले, असे ते म्हणाले आहेत.
अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनाही भाजपने जेलच्या दारापर्यंत नेले होते, भाजपमध्ये सर्वच जण चांगले नाहीत, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. महायुतीतील पक्षांमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध दर्शवणारे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. तिकडे, भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी एका विशिष्ट धर्मीयांविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. विशिष्ट धर्मीयांबाबत ते सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत.
शिवरायांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिमधर्मीय नव्हता, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. शिवरायांचे वंशज, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीच मंत्री राणे यांचे हे विधान खोडून काढले आहे. शिवरायांनी कधीही जात-धर्म पाहिली नाही, असे ते म्हणाले आहेत. शिवरायांच्या सैन्यात महत्वाच्या पदांवर अनेक मुस्लिम होते, असे इतिहास सांगतो. हा इतिहास आपल्याला मान्य नाही, असे राणे वारंवार सांगत आहेत.
नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधांनाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही समाचार घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप हे मंत्री राणे यांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिमांच्या बाबतीत वादग्रस्त विधाने केली आहेत, याचा विसर अजितदादांना पडला आहे.
नितेश राणे हे मंत्री आहेत, म्हणजे ते घटनात्मक पदावर बसलेले आहेत. त्यामुळे मंत्र्याला आपल्या नागरिकांमध्ये असा भेदभाव करता येत नाही. संविधानाला साक्षी ठेवून तशी शपथ त्यांनी घेतलेली असते. कुणी जर हे प्रकरण न्यायालयात नेले तर राणे आणि भाजपची (BJP) मोठी गोची होऊ शकते. मंत्री राणे यांच्या वादग्रस्त विधानांकडे त्यांच्या पक्षानेही दुर्लक्ष केले आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात कोणते कोणते संकट सातत्याने निर्माण होत आहे.
परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उभ्या बसमध्ये तरुणीवर दुष्कर्म. संतोष दशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना विलंबाने का होईना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सरकारचे अपयश अधोरेखेखित करणारी ही काही ठळक उदाहरणे आहेत. गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे, हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.
महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. ते लक्षात घेऊनच या योजनेतील महिलांचे मानधन वाढवण्याची घोषणा जोरकसपणे करण्यात आली होती, प्रचारही तशाच पद्धतीने करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही घोषणा करण्यात आली होती. अर्थसंकल्पात या दोन्ही घोषणांचा साधा विचारही करण्यात आलेला नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही.
कायदा-सुव्यवस्थेची स्थितीही बिघडत आहे. अशा परिस्थितीत करायचे काय? यातूनच लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मंत्री राणे यांना पुढे करण्यात आले असेल. मात्र हे उशीरा का होईना लोकांच्या लक्षात येणार आहे. लोकांना हेच आवडते, असे गृहीत धरले तरी त्यामुळे राज्याची बदनामी होणार आहे. सर्वच आघाड्यांवर पिछेहाट होणार आहे, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. महायुतीतील तिन्ही पक्षांतील शीतयुद्ध उफाळून आले आहे.
त्याचा सरकारला कोणताही धोका नाही, हे खरे असले तरी सरकारच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे. राज्यात पोरखेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपने राज्यातील दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष फोडले. त्याद्वारे महाविकास आघाडीचे सरकार पाडले.
त्यानंतर अडीच वर्षे महायुतीतील तिन्ही पक्षांत शीतयुद्ध पाहायला मिळाले. अडीच वर्षे आरोप-प्रत्यारोपांतच गेली. तरीही मतदारांनी महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला. त्यामुळेच की काय आता तर सत्ताधारी जाहीर घोषणा करून पक्ष फोडत आहेत. मूळ मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. महायुतीला प्रचंड बहुमत देऊनही महाराष्ट्राच्या पदरात अशांतता पडली आहे, राजकीय गोंगाट वाढला आहे.