ठाकरेंच्या आमदाराच्या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेलं ‘ते’ उत्तर चर्चेत…
मी माझ्याच गाडीतून फिरतो, मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामा संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केल्याचं सांगितलं.
ते म्हणाले,मुंबई-गोवा महामार्गाचे 2011 पासून काम सुरू आहे. या कामास विलंब झाला आहे. कोकणातील बरेच लोक मुंबईस वास्तव्यास असून त्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करत आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने हा महत्वाचा महामार्ग आहे. राज्याच्या विकासात या मार्गाचा मोठा वाटा आहे.
मी स्वत: या महामार्गाची पाहणी केली. आता भास्करराव व्हॅनिटी व्हॅन म्हणाले, पण मला त्याची गरज नाही. मी माझ्या स्वत:च्या गाडीतून फिरतो. यावेळी मी संपूर्ण हायवेची पाहणी केली. सर्व लोकप्रतिनिधींना भेटलो.
त्या दिवशी भास्कर जाधवांना पण भेटायचं होतं. घाबरायचा काही विषय नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं.” तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी सभागृहात दिली.
