
बुरा न मानो होली है !
होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून, साजरा केला जाणारा लोकप्रिय हिंदू सण आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचे विरुद्ध टोक एकत्र आले आहेत.
ही किमया घडली आहे, ज्यांनी शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी बंड केले त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि शिंदेंची शिवसेना होळीचा सण साजरा करण्यासाठी एकत्र येत ‘बुरा न मानो होली है!’, असे म्हणत सेलिब्रेशन केले.
राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत(Shivsena) बंडाळी करत भूकंप आणला. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार यामुळे कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हं दोन्ही ताब्यात घेतले. उद्धव ठाकरे यांनी संयमाने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहे. त्यामुळे पुढं काय निकाल येईल, तो येईल. पण राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये टोकांचं राजकारण आहे. संघर्ष पंटत आहे. या दोन्ही पक्षामधील भडका कधी उडेल याचा नेम नाही.
राज्यातील महायुती सरकारचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्या दिवशी अधिवेशनाला हजेरी लावली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी विधिमंडळ सभागृहाच्या लाॅबीत असतानाच, समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आले. पण ठाकरे अन् शिंदेंनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. एवढं हे राजकीय वितुष्ट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले.
राज्यातील दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष तीव्र असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र होळी सणानिमित्ताने ठाण्यातील डोंबिवली इथं दोन्ही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा ‘भाईचारा’ पाहायला मिळाला. शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे , ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी एकत्रित होळी साजरी केली.
डोंबिवली मोठा गाव येथे गेल्या 25 वर्षांपासून ‘एक गाव एक होळी’, साजरी केली जाते. या कार्यक्रमाला शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देत दोन्ही बाजूकडून पक्षभेदापलीकडची मैत्री जपल्याचे दाखवले. या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत, साजरी केलेल्या होळी सणामुळे हीच शिवसेना पुन्हा अखंड होईल का? अशा चर्चेला तोंड फुटले आहे.