दैनिक चालु वार्ता चंदगड प्रतिनिधी – संदिप कांबळे
जागृत देवस्थान श्री माऊली देवीची यात्रा दि. २१, २२ व २३ मार्च असे तीन दिवस असणार
कोल्हापूर (चंदगड) : मौजे कोदाळी येथील ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा शुक्रवारी दि. २१ रोजी पासून सुरु होत असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आले आहे.
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार असला तरी दि. २१ ते २३ अखेर अशी तीन दिवस यात्रा चालू राहणार आहे. चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर, गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसराबरोबर देव देवतांच्या मूर्तीची स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे, यात्रौत्सव काळात लावण्यात येणारी दुकाने, पाळणे तसेच भाविकांची गैर सोय होऊ नये यासाठी पार्किंगची सोय देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आली आहे. तसेच यात्रा काळात पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी दि. २१ रोजी देवीचा जागर असून रात्री ठीक ११ वा. मदन राजवाडकर लिखित तीन अंकी ऐतिहासिक व काल्पनिक नाटक सम्राटांचा सम्राट नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवार दि.२२ रोजी यात्रौ उत्सवाचा मुख्य दिवस असून सकाळी महाआरती, दुपारी ठीक १२ वा. महाप्रसाद, संध्याकाळी ठीक 4 वा. पालखी रिंगण सोहळा तर रात्री 11 वा. कोकणातील दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तर रविवारी दि. २३ रोजी माऊली देवीच्या जुन्या हरक्या फेडणे यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे असे तीन दिवस यात्रा उत्सव चालु राहणार असून भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व श्री माऊली देवी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था कोदाळी तसेच स्थानिक ग्रामस्थांनानी केले आहे.
