दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
पैठण : पैठण संत एकनाथ महाराज यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरामध्ये नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येने नागरिकांना चांगलेच हैराण करून टाकले आहे. नगरपालिकेकडून प्रत्येक घराला पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले असूनही, नळाला पाणी येत नाही आणि आले तरी वेळेवर पुरवठा होत नाही.
यात्रा महोत्सवाच्या दरम्यान, नागरिकांना पाणी पुरवठा कमी असल्यामुळे तोंड धरावे लागले आहे. त्यातच संत एकनाथांची षष्ठी, भक्तियात्रा आणि धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले असुन हे लक्षात घेता पाणी पुरवठा न होणे एक मोठी अडचण ठरली आहे.
सध्याच्या स्थितीमुळे यात्रा महोत्सवात सहभागी पर्यटक व भाविक भक्तांना खूप त्रास होत आहे. या समस्येवर नगरपालिकेने त्वरित दखल घेऊन योग्य पाणी पुरवठा व्यवस्था लागू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
या संदर्भात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पाणी पुरवठ्याच्या समस्येवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे आणि या समस्येचे त्वरित निराकरण होण्याची अपेक्षा आहे.
यात्रेच्या आनंदात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या महोत्सवात भाग घेणाऱ्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित होईल की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रत्येक घरामध्ये यात्रेनिमित्त पाहुणे आलेले आहे, त्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. दरवर्षी पेक्षा चालु वर्षी पाणीपोई सुद्धा कमी प्रमाणात दिसुन येत आहे. पायी येणाऱ्या दिंडितील भाविक भक्तांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत असुन पाण्याची आवश्यकता आहे.