
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील मौजे लिंबेवाडी येथे बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय होत असून, गावातील काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करत आहेत. बौद्ध विहार परिसरात चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा आणणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, तसेच बौद्ध समाज बांधवांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार सुरूच आहेत.
एप्रिल २०२४ मध्ये गावातील एका युवकावर निळ्या ध्वजाच्या वादातून हल्ला करण्यात आला होता. तसेच गावातील हनुमान मंदिरात बैठक घेऊन बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे, तर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांवर बंदी घालण्यात आली.
येत्या २०२५ च्या भीमजयंतीला अडथळा आणण्याच्या धमक्या दिल्या जात असून, बौद्ध समाजाच्या शेतरस्त्यांवरही बंदी घालण्याचा कट रचला जात आहे. या सर्व घटनांमुळे गावात सामाजिक शांतता भंग होत असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जातीवादी समाजकंटकांवर ऑट्रोसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करत पोलिस व प्रशासनाने त्वरित लक्ष घालून गावातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी, अशा आशयाचे निवेदन देत गंगाखेड तहसीलदार यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेचे पदाधिकारी व लिंबेवाडी येथील बौद्ध बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.