
कोर्टाने दिली घटस्फोटाला मंजुरी…
भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि यूट्यूबर/डान्सर धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनाचा शेवट झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (दि.20) वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
दोघे डिसेंबर 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. आता दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
कूलिंग पीरियडला सूट
गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे वेगळे राहत होते आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सहा महिन्यांच्या अनिवार्य कूलिंग पीरियडला सूट मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय बदलून त्यांना ही सूट दिली आणि घटस्फोटाची प्रक्रिया जलद पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा केला.
आयपीएलपूर्वी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चहल आणि धनश्री यांच्या सहमतीने झालेल्या घटस्फोटाला मंजुरी देताना ६ महिन्यांच्या कूलिंग पीरियडमधून सूट दिली. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला 20 मार्चपूर्वी यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की चहल 21 मार्चपासून आयपीएलसाठी उपलब्ध राहणार असल्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी.