
गद्दारी करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शनिवारी (ता.22) वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट येथे बंद केबिनमध्ये चर्चा झाली.
मागील अनेक दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अशातच आता या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिमटा काढला आहे. त्यांचं उत्तम चाललेलं असतं, शिवसेनेतून आमचे सुद्धा काही लोक सोडून गेले पण आम्ही त्यांच्या वाऱ्याला सुद्धा जात नाही, असं म्हणत या भेटीवर त्यांनी टीका केली आहे.
वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीला जेष्ठ नेते शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, शरद पवार बैठकीला दाखल होण्याआधीच जयंत पाटील आणि अजितदादांमध्ये बंद केबिनमध्ये चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी त्यांचं उत्तम चाललेलं असंत म्हणत टोला लगावला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?
अजितदादा आणि जयंत पाटलांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “त्यांचं उत्तम चाललेलं असतं. शिवसेनेतूनही आमचे काही लोक बाहेर पडले. मात्र, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या लोकांच्या वाऱ्यालाही आम्ही जात नाही. पण यांच्याकडे भेटीसाठी विद्या प्रतिष्ठान असतं, वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट असतं.
सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असतेच. पण आमच्याकडे असं काही नाही. त्यामुळे भेटीचा प्रश्न येत नाही आणि राजकारणात संवाद ठेवला पाहिजे असा दांभिक गोष्टीवर आमचा विश्वास नाही. शिवाय ज्यांनी आमचा पक्ष तोडला त्यांच्य कडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. संधी आली तरी आम्ही संवाद टाळतो.
आमच्याकडे अशा संस्था नाहीत आम्ही फाटके रस्त्यावरचे लोक आहोत. पण आम्ही शेवटपर्यंत भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू, असं म्हणत राऊतांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटलांवर निशाणा साधला.