
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या 426 व्या नाथ षष्टीचा आज सायंकाळी उत्साहपूर्ण समारंभ पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याला श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मधुर वाणीतून काल्याचे किर्तन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दही हंडी फोडण्याचा महत्वाचा सोहळा पार पडला.
प्रत्येक वर्षी प्रमाणे, यावर्षीही नाथ वंशज ह.भ.प. रावसाहेब बुवा गोसावी यांच्या हस्ते मंदिरात दही हंडी फोडण्यात आली. त्यानंतर दुसरी दहिहंडी नाथ संस्थान विश्वस्ताकडून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, पैठणचे आमदार विलास भुमरे, आणि विश्वस्त दादा बारे यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या हस्ते फोडण्यात आली.
आज सकाळपासून नाथ वंशज यांच्या मानाच्या पालखीचा सोहळा सुरू झाला. पालखी नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी सर्व नाथ वंशज मतभेद बाजूला ठेवून पालखीमध्ये सहभागी झाले, यावेळी सर्व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मंदिरात पोहोचल्यावर मंदिरात आणि मंदिराबाहेर किर्तन पार पडले. त्यानंतर काल्याची दही हंडी फोडण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, तहसीलदार दत्ता भारस्कर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी संतोष आगळे, अशोक मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी वारकरी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.