
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
भोर,जि.पुणे : भोर तालुक्यातील कान्हवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री मंडाई मातेच्या दोन दिवसीय यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. देवीच्या मिरवणूकीसह विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यत, लोकनाट्य आणि जंगी कुस्त्यांचा फड पाहण्यासाठी अलोट जनसमुदाय लोटला होता.
यात्रेच्या निमित्ताने शनिवारी पहाटे देवीला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये बैलगाडा चालकांनी आपले कौशल्य दाखवून दिले. सायंकाळी लेझीम आणि ढोलताशांच्या गजरासह देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर रविवारी मास्टर महादेव मनवकर यांचा लोकनाट्य तमाशा सह विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी रंगला जंगी कुस्त्यांचा फंड, लाखोंच्या बक्षीसांची लयलूट
श्री मंडाई माता यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचा फड भरविण्यात आला होता. कान्हवडी गावकऱ्यांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून भव्यदिव्य कुस्ती फडाचे आयोजन केले जात आहे. यावेळी वीस गाव खोर्यातील अनेक पैलवान आपले कसब दाखवण्यासाठी आले होते. पैलवानांचे शड्डू ठोकणे, कुस्तीनंतर वस्तादांचा जयघोष, तालीमीच्या नावाचा जयजयकार, विजयी पैलवानांनी आकर्षक पध्दतीने उड्या मारून साजरा केलेला आनंद आलेल्या हजारो प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी ठरला.
मंडाईमाता यात्रेच्या निमित्ताने यंदा कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र चॅम्पियन पै. नवनाथ शेडगे व जिमनॅस्टिक मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन वेळा नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट म्हणून नावलौकिक मिळविलेल्या साहिल मरगजे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.