
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी (पुणे)
श्रीक्षेत्र आळंदी-गेल्या दोन दिवसांत सर्वांनी पाण्याची समस्या सांगितली. हा दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या पाच सहा महिन्यांत ही समस्या निर्माण झाली असून, मी तिच्या मुळाशी जाण्याचा आणि दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कार्यकाळात आळंदीकरांना रोज पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करेन, असे नूतन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आश्वासन दिले आहे.
आळंदीत पथदिव्यांचे उद्घाटन
आळंदी नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी कार्यभार स्वीकारताच सक्रियपणे कामाला सुरुवात केली आहे. हरिपाठ उद्यानाजवळील गुरुवर्य शांतीनाथ महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १३ नव्या पथदिव्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात झालेल्या या सोहळ्यास
पालिकेचे बांधकाम अधिकारी सचिन गायकवाड, विष्णुकुमार शिवचरण, संजय घंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, दीपक पाटील, उमेश कुऱ्हाडे, मनोज कुहर्हाडे, संकेत वाघमारे, अनिल वाघमारे, अशोक कांबळे, रंगनाथ महाराज, माऊली बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी खांडेकर यांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार केला. खांडेकर म्हणाले की, वडिलांच्या पुण्याईने मला तीर्थक्षेत्र आळंदीत सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा आलो तेव्हा
माऊलींच्या संजीवन समाधीवर नतमस्तक झालो आणि त्यांना सेवा करण्याची संधी मागितली. माऊलींनी ती संधी दिली असून, मी ती सोनं करेन. मागील मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शहरात विकासाचा मजबूत पाया घातला; त्याचप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन मी काम करेन. त्यांनी पाणी समस्येवर विशेष भर दिला. खांडेकर पुढे म्हणाले, जिथे पथदिवे नाहीत, तिथे निधी आणून ती समस्या सोडवली जाईल, असे त्यांनी नमूद केले.