दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा पक्ष) आक्रमक झाला आहे.रोजगार हमी योजना, घरकुल, आदिवासी पाड्यातील मुख्य रस्ते, गायींचे गोठे, शौचालय आदी मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने पंचायत समितीवर जंबो शिष्टमंडळ पाठवण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, विस्तार अधिकारी, तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी १५ मेपूर्वी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत प्रश्न मार्गी न लागल्यास अधिकाऱ्यांना बेमुदत घेराव घालण्याचा इशारा लोकशाही महिला संघटनेच्या डहाणू तालुका अध्यक्षा काॅ.सविता महालोडा यांनी दिला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष काॅ. सिता जाधव, भामाले पक्षाचे डहाणू तालुका कमिटी सदस्य काॅ. रामजी बरड, काॅ.अन्या मोर, काॅ. वामन किंडरा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.लाल बावट्याच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. आगामी काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
