
सहा दिवसात करणार ऐतिहासिक कामगिरी…
महाराष्ट्र भाजपने आतापर्यंत तब्बल 1 कोटी 44 लाख सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. येत्या सहा दिवसांमध्ये आणखी सहा लाख सदस्य नोंदणी करून 1 कोटी 50 लाखांपर्यंत सदस्य संख्या नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
सहा दिवसांत हा आकडा निश्चित गाठू असा विश्वास नेते व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे.
भाजप हा ‘जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभेत कामगिरी असमाधानकारक झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी 72 लाख 93 हजार 650 मते झोळीत पडली.
मात्र या मतांमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे स्वत:ची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला. राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट आधी दिले होते. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आतापर्यंत राज्यातील भाजपने 1 कोटी 44 लाख सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. येत्या सहा दिवसांत आणखी सहा लाख पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
लोकसभेतील मतदानापेक्षा जास्त सदस्य नोंदणी :
भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाली होती. तर आतापर्यंतची सदस्यसंख्या 1 कोटी 44 लाख झाली आहे. ही सदस्यसंख्या लोकसभेला झालेल्या मतदानापेक्षा जेमतेम सहा लाखांनी कमी आहे. ही दरी येत्या सहा दिवसांत पूर्ण करून 1 कोटी 50 लाख सदस्यसंख्या गाठण्याचा विश्वास पक्षनेते व्यक्त करीत आहेत.