
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारीची बैठक शुक्रवारी (ता.28) झाली. ही बैठक प्रामुख्याने स्थानिक साधू आणि महंतांची होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सुरुवातीला असलेला गोंधळ दिसून आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची भेट घेतली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील असे आश्वासित केले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधू निश्चिंत आहेत.
दरम्यान नाशिकच्या बैठकीमध्ये स्थानिक आखाडे आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मात्र गोंधळाची स्थिती आहे. या बैठकीत वारकऱ्यांसाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र वारकरी कुंभमेळ्यात स्वतंत्र स्नान करत नाहीत. त्यांना तसा अधिकार देखील नाही. त्यामुळे ही मागणी करून मंत्री महाजन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
वारकरी संप्रदायाचे आठ ते दहा खालसे आहेत. त्यापेक्षा अधिक वारकरी कुंभमेळ्याच्या साधू ग्राममध्ये राहुट्या टाकून मुक्काम करत नाहीत. वारकरी संप्रदायाचे सर्व आखाडे निर्मोही अनिच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे स्वतंत्र जागेची मागणी करताना निर्मोही आणि त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न पडतो.
नाशिक शहरात सध्या अनेक स्वयंघोषित साधू आणि महंत आहेत. ते खरोखर महंत आहेत का? हे तपासण्याची आवश्यकता आहे. याबाबत पोलिस आणि महसूल विभागाची जबाबदारी वाढली आहे. स्वतंत्र महंत असले तरीही त्यांना आनिच्या अंतर्गतच कुंभ व्यवस्थेत भाग घेता येतो. मग सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारे साधू आणि महंत कोण? ही नागरिकांमध्ये चर्चा आहे.
एकंदरच अपेक्षा वाढलेले स्थानिक साधू विविध मागण्या करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न तर करत आहेत का हे देखील पाहावे लागणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत प्रशासनाला अतिशय सावधपणे वाटचाल करावी लागेल अशी स्थिती आहे.
काल नाशिकला झालेल्या बैठकीत दिगंबर आखाड्याचे डॉ किशोरदास शास्त्री, भक्ती चरणदास, बडा लक्ष्मीनारायण मंदिर संस्थेचे महंत रामनारायणदास, महंत कृष्णचरणदास, महंत राजारामदास, महंत भगवानदास, महंत नरसिंगाचार्य, महंत बालकदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.