
दिल्लीत स्वतंत्रपणे मंत्र्यांच्या भेटीगाठींवर जोर…
भाजपाच्या राज्यसभेतील दोन खासदारांमध्ये सध्या विकास कामांवरून चांगलीच स्पर्धा लागली आहे. राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार अशोक चव्हाण, डाॅ. अजित गोपछडे यांनी दिल्लीतील भेटीगाठींवर जोर देत स्वतंत्रपणे मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा गोपछडे यांनी एका भाषणात अशोकराव तुम्ही हळूहळू अजगरासारखे मोठे व्हाल, अशी भिती व्यक्त केली होती. या निमित्ताने यांची चर्चाही होत आहे. विकास कामांसाठीची स्पर्धा चांगली आहे, परंतु यातून कुरघोडीचे राजकारण होऊ नये, हीच नांदेडकरांची अपेक्षा आहे.
खासदार अजित गोपछडे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नांदेड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी केली. या शिवाय शेतकऱ्यांसाठी नांदेड येथे आयसीएआरच्या संशोधन केंद्राची शाखा सुरु करावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर नुकतीच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री नायडू यांची भेट घेऊन नांदेड-मुंबई थेट विमान सेवा सुरु करण्याची मागणी केली.
नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी चव्हाण यांची केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासोबत चर्चा झाली. नांदेडच्या श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासाठी थेट हवाई सेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या या चर्चेत चव्हाण यांनी नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे प्रमुख अडथळे असल्याचे नमूद केले.
नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, याकडे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच, त्यानंतर नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नायडू यांनी या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नांदेड-मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नांदेड विमानतळावरील सुविधा सुधारण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून येथे दोन हवाई वाहतूक व्यवस्थापन अधिकारी आणि एक संचार, दिशादर्शन व देखरेख यंत्रणा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या नवीन नियुक्त्यांमुळे विमानसेवेचा विस्तार शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.