
गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच वादग्रस्त वक्तव्य !
चंद्रपूर : मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याला पडू दे, मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का?
इतर राज्यात का नाही, असं म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहते. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी बोलताना काल(30 मार्च संध्याकाळी माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
एकीकडे शुभेच्छा, दुसरीकडे गुढीपाडव्याबाबत प्रश्नचिन्ह ?
दरम्यान, एकीकडे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे केलं असताना त्याच वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांनी नवं गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. त्यात ते म्हणाले कि, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. असे म्हणत त्यांनी एक्स या माध्यमावार पोस्ट केली आहे. त्यामुळे एकीकडे प्रश्नचिन्ह उभे करणारे काँग्रेसचे गटनेते वडेट्टीवार त्याच सणाला ते शुभेच्छा देत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.