
मग आरक्षणाची काय गरज -राज ठाकरे ?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या गुढीपाडवा मेळाव्यातून संतोष देशमुख हत्याकांडासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, ‘संतोष देशमुखांना किती घाणेरड्या पद्धतीने मारले गेले.
हे सगळे कशातून झाले? विंडमील, राख, खंडणीच्या पैशातून…मी आजपर्यंत ऐकले होते की, राखेतून फिनिक्स उभारी घेतो, पण बीडमध्ये राखेतून गुंड उभारतोय. विषय होता पैशाचा. वाल्मिक कराडने खंडणी मागितली, संतोष देशमुखने विरोध केला, त्याला संपवले. त्याच्या जागे दुसरा कोणी असता, तरी हेच झाले असते. पण, आपण लेबल काय लावले, वंजाऱ्याने मराठ्याला मारले. यात वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध?’ असा थेट सवाल प्रमुख राज ठाकरेंनी केला. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज ?
आपण कशात गुंतवून पडतोय? तुम्हाला गुंतवले गेले आहे. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पाहू नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे पाहू नका. आता दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. पण त्याकडे पाहू नका. आपल्याकडे रोजगार निर्माण होत नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुल-मुली मराठवाडा सोडून पुण्यात येतात, त्याकडे पाहू नका. आपण कशात अडकलोय, जातीपातीत! कोणी जातीचे भले केले नाही. या महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागते? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त मतदानासाठी जातीचा उपयोग करतात,’ असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका…
राज ठाकरे पुढे म्हणतात, ‘निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू म्हणाले होते, पण काल अजित पवार म्हणाले, 30 तारखेच्या आत पैसे भरा, कर्जमाफी होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर तु्म्ही वाटेल ते बोलणार आणि त्यानंतर माघार घेणार. राज्यातील जनतेला मला विचारायचे आहे, तुम्ही मतदान करता कसे? लाडकी बहीण योजनाही बंद होणार. सरकारकडे पैसेच नाहीत. कर्ज काढून दिवाळी साजरी करायची कशाला? राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. पण, राज्यातील मुला-मुलींना कळत नाही, त्यांना जातीत गुंतवले जातेय. मूळ प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. तुम्ही मूळ प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरले पाहिजे. आपलेच लक्ष नसेल, तर त्यांचे फावणारच आहे. तु्म्ही सगळे जातीचे भेद बाजुला सारुन मराठी म्हणून उभे राहिले पाहिजे. तामिळनाडू, केरळात हिंदीला नकार देतात आणि आपण लोटांगण घालतो. आम्हालाच समजत नाही काय करायचे…इतका भांबावलेला मराठी माणूस मी कधीच पाहिला नाही.