
राजकीय भूकंप घडवत रोहित पवारांना होम ग्राऊंडवर झटका ?
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहे. भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता पलटवण्याची तयारीत आहेत.
भाजपचे प्रा. राम शिंदे यांच्याशी रात्री उशिरा बैठक करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. सत्ता परिवर्तन घडवून आणण्यास प्रा. राम शिंदे यांना यश मिळाल्यास, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभापती पदाचं ‘रिटर्न गिफ्ट’ असेल, असे सांगितलं जात आहे. प्रा. राम शिंदे यांनी याबाबत डिटेल्स बोलण्यास नकार, देत आजच सर्व उत्तर मिळून जातील, असं म्हणत ते मुंबईला रवाना झाले.
कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)शरदचंद्र पवार पक्षाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसचे तीन नगरसेवकांनी भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. ही बैठक म्हणजे, कर्जत नगरपंचायतीत सत्ता पलटणार, अशी संकेत देणारी आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत भाजपच्या प्रा. राम शिंदेंच्या सत्तेला सुरूंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 12, काँग्रेसचे तीन आणि विरोधी भाजपला दोन, असे जागा मिळाल्या होत्या.
नगराध्यक्षापदी उषा राऊत, तर सहयोगी असणाऱ्या काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली होती. पुढं योगायोगाने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. प्रत्येक निवडणुकीत राऊत कुटुंबियांना महत्वाचे पद जाते, यावर पक्षातील काही नगरसेवकांमध्ये रोष होता. मात्र आमदार रोहित पवारांसमोर कोणी उघड-उघड विरोध करत नव्हते. विरोध करायचा, तर कोणी करायचा, यावर एकसंघ होताना दिसत नव्हते. पाच वर्षे मागील पदाधिकारीच आपल्या पदावर कायम राहतील, हा निर्णय पुढे आल्याने अडीच वर्षांनंतर इच्छुक असल्यामध्ये पुन्हा असंतोष उफाळून आला.
दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आले. प्रा. राम शिंदे आता विधानपरिषदेचे सभापती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सभापती करत मोठं गिफ्ट दिलं. याबदल्यात प्रा. राम शिंदेंनी रिटर्न गिफ्ट देण्याचं ठरवलं होते. कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादीची सत्ता पलटवून, भाजपची सत्ता तिथं आणणं हेच, तर ते रिटर्न गिफ्ट नसेल ना, अशी चर्चा आता होत आहे.
प्रा.राम शिंदेंशी रात्री उशिरा बैठक
राज्यात सत्ता नसल्याने विरोधी नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी मिळवण्याची अडचण येत आहे. यातच प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघात नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांना डावलून विकास कामांचा धडाका लावला आहे. हेच हेरून कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राम नवनीचे औचित्य साधत प्रा. राम शिंदेंशी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीनंतर संबंधित नगरसेवक सहलीवर देखील रवाना झाले आहेत. ही बैठक म्हणजे, कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सत्तेला सुरूंग लावणारी ठरणारी आहे.
प्रवीण घुले ठरले ‘किंगमेकर’
प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची यशस्वी बैठक झाली. ही बैठक यशस्वी घडवून आणण्यामागे भाजपचे स्थानिक नेते प्रवीण घुले यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे समोर येत आहे. या सत्ताधारी नगरसेवकांत घुले यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या नगरसेवकांची मोट बांधून त्यांना अज्ञातस्थळी सहलीला रवाना करण्यात आले असून तत्पूर्वी केलेल्या फोटो सेशनमध्ये प्रवीण घुले दिसत असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.