दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर :
वादग्रस्त जागेवर शासकीय मोजणी केल्याशिवाय बांधकाम करू नये असे आदेश मरखेल ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेले असताना, सदर निर्णयाविरुद्ध कोर्टात दाद मागणाऱ्या बांधकाम धारकाने इतरांच्या जागेवर अतिक्रमण करत कोर्टातील अंतरिम अर्ज फेटाळला असताना न्यायालयाचे अवमान व ग्रामपंचायतीचे आदेश धुडकावत बांधकाम करत असल्याची तक्रार मरखेल येथील बालाजी बाचीपळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात, तक्रारदार बालाजी अप्पाराव बाचीपळे हे आपल्या विधवा आईसह राहतात. तक्रारदाराच्या घराशेजारी असलेल्या प्रदीप तेजेराव धुमाळे व तेजेराव केरबा धुमाळे यांचे सध्या घर बांधकाम सुरू आहे. सदर व्यक्ती तक्रारदार यांच्या मालकी व ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधकाम करत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेस निवेदनकर्त्यांने लेखी तक्रार दिली. तक्रारदार व त्याच्या आईस धमकी देण्यात आली. याउपरही दखल घेतली जात नसल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान मरखेल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तक्रारदार व बांधकाम धारक दोघांनाही नोटीस देत बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. बांधकाम धारक प्रदीप धुमाळे यांनी देगलूर न्यायालयात धाव घेत सदर आदेश रद्द ठरवून बांधकाम सुरू ठेवण्याबाबत अंतरिम आदेश व्हावा यासाठी दावा दाखल केला. मात्र सदरचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला. याउपरही सदर व्यक्ती ही माझ्या जागेवर अतिक्रमण करत ग्रामपंचायत आदेश धुडकावले तर न्यायालयाचे अवमान करत असून, संबंधितांवर कडक कार्यवाही करून तात्काळ बांधकाम थांबविण्याची मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.