
अधिवेशनातील संदेशाचा अर्थ काय ?
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबादमध्ये पार पडले. यावेळी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी नेतेमंडळींची कानउघडणी करीत काही उपदेशाचे डोसही नेतेमंडळींना दिले.
ज्यांनी पक्षाला कोणतीच मदत केली नाही. त्यांनी विश्रांती घ्यावी आणि ज्यांना पक्षाची जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्ती स्वीकारण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि देशात मजबूत विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्यासाठी, बदल अपरिहार्य आहे. फक्त चेहरे बदलून नाही, तर विचार, पद्धत, आणि कार्यशैलीत परिवर्तन घडवावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात मल्लीकार्जुन खरगे यांनी दिलेला हा इशारा काँग्रेस नेत्याच्या पचनी पडणार का? याची उत्सुकता लागली आहे.
काँग्रेस (Congress) पक्षात जे लोक सक्रिय सहभाग घेत नाहीत किंवा जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, त्यांनी आता विश्रांती घ्यावी किंवा निवृत्ती स्वीकारावी. यामागचा उद्देश पक्षात येत्या काळात नव्या दमाच्या आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी द्यावी असाच आहे. खरगे यांचा हा सल्ला पक्षातील निष्क्रिय नेत्यांसाठी एक प्रकारचा इशारा देखील मानला जात आहे. विशेषतः निवडणुका जवळ येत असताना, पक्षाचे संघटन बळकट करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे महत्त्वाचे ठरते, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही वर्षांत काँग्रेसला लोकसभा आणि अनेक राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. जनतेशी संपर्क कमी, प्रभावी नेतृत्वाचा अभाव आणि जमिनीवरील संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. पक्षात अनेक जुने नेते अजूनही निर्णय प्रक्रियेत प्रभाव टाकत असले तरी तरुण कार्यकर्त्यांना आणि नवीन विचारांना फारसा वाव दिला जात नाही. ही जनरेशन गॅप काँग्रेसच्या अडचणींना अधिक तीव्र करत आहे.
गेल्या काही दिवसातील काँग्रेसची कामगिरी खूपच निराशजनक राहिली आहे. गेल्या ३० वर्षात काँग्रेसला स्वबळावर बहुमतापर्यंत पोहचता आले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यामध्ये आलेली मरगळ दूर करण्याची जबाबदारी नेतेमंडळीवर असणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने अधिवेशनाच्या निमित्ताने नेतेमंडळीना पुन्हा पूर्वीप्रमाणे कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार आणि प्रसार करत साम-दंड नीतीचा अवलंब करीत विजयाची हॅटट्रिक केली आहे. त्याशिवाय विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रसंगी तपास यंत्रणेचा वापर केल्याने काँग्रेसच्या नेतेमंडळीमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपशी जुळवून घेतात, अशा अनेक तक्रारी पक्षातील नेटमंडळीने केल्या आहेत. त्यामुळेच आता येत्या काळात त्यांच्याविषयी कठोर भूमिका घेण्याशिवाय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेतेमंडळींना इशाराच या निमित्ताने दिला आहे.
पक्षाध्यक्ष खरगे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे नेते के. कामराज यांनी पक्षातील नेत्यांना शिस्त लावण्यासाठी त्याकाळी राबवलेल्या योजनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. के. कामराज हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना 1963 साली कामराज यांनी पक्षाच्या बड्या नेत्यांनी सत्तापदे सोडून द्यावेत आणि पक्ष कार्यासाठी वाहून घ्यावे, अशी योजना मांडली होती. या कामराज यांच्या योजनेला त्याकाळी मोठा प्रतिसाद मिळाला होता. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील सहा ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी आणि सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन सत्तेचा त्याग करीत पक्ष कार्याला वाहून घेतले होते.
गेल्या काही दिवसात सतत सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षाची भूमिका कशी निभवायची हेच विसरून गेले आहेत. 1991च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवता आलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सलग तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार पश्चिम बंगाल, ओडिसा या प्रदेशात गेली चार दशके काँग्रेस सत्तेपासून दूर आहे.
पक्षाकडे निवडणुकीत बहुमताचे गणित साध्य करणारी यंत्रणा नसेल तर पक्षाला यश कसे मिळणार? हा प्रश्न पक्षाध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षातील नेतेमंडळींना सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या नेतेमंडळींना पक्षाच्या अधिवेशन काळातच इशारा दिला आहे. त्यामुळेच हा खरगे यांनी दिलेला सल्ला काँग्रेसच्या या अधिवेशनात अधिक चर्चेत राहिला आहे.
त्यामुळे येत्या काळात काँग्रेसचे नेतेमंडळी या दिलेल्या सल्ल्याचे कशाप्रकारे पालन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी येत्या काळात संघटनात्मक बांधणीला महत्त्व देण्याची गरज आहे. काँग्रेसकडे भाजपप्रमाणे बूथ लेव्हलची यंत्रणा नाही. कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात किती सदस्य आहेत, याची कल्पना नाही. काँग्रेसमध्ये अनेक शहरात कार्यकारणी देखील नाही. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसपुढे भाजपसारखे मजबूत संघटन उभारण्याचे आव्हान असणार आहे.
त्यासोबतच आजची काँग्रेस काय विचार घेऊन उभी आहे? त्यांची भूमिका काय आहे ? हेच अनेक सामान्य मतदारांपर्यंत पोहोचत नाही. मोदी सरकारविरोधात असणं पुरेसं नाही, स्वतःचं वेगळं, ठोस व्हिजन दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या काळात त्यासाठी काँग्रेस काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे.