
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
जेजुरी,दि.२२ (वार्ताहर ) महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया बहुजन बांधवांचा सर्वसामान्यांचा लोकदेव म्हणून गणला जातो. मात्र ,सध्या खंडेरायाचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळ सर्वसामान्यांसाठी नव्हे तर व्हीव्हीआयपी भक्तांची सरबराई करण्यासाठी आणि चमकोगिरी करण्यासाठीच कार्यरत असल्याचे दिसून येते .
लावणीनृत्य अदाकारीतून सध्या राज्यातील तरुणाईसह आबालवृद्धांना वेड लावणारी *गौतमी पाटील* हिने नुकतेच जेजुरीच्या खंडेरायाचे देवदर्शन घेतले ,मात्र रविवारच्या दिवशी गडावर जाणाऱ्या वाहनांसाठी आपत्कालीन घाटरस्ता जो बंद ठेवण्याचा नियम विश्वस्त मंडळाने केला असल्याने गौतमी पाटील चे वाहन घाटरस्त्यावरून सोडता येईना .आता काय करायचे ?
हा प्रश्न पडलेल्या देवसंस्थान व्यवस्थापनाने नामी शक्कल लढवली , आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडकोटाच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा वापर गौतमी पाटील हिला गडावर नेण्या आणण्यासाठी करण्यात आला. मात्र ,काही जागरूक भाविकांनी या रुग्णवाहिकेसह गौतमी पाटीलचे फोटो काढून ते प्रसार माध्यमांवर टाकले आणि नेटकर्यांनी टीकेची झोड उठवली विशेष म्हणजे एका विश्वस्तांनी गडातील कार्यालयात गौतमी पाटील चा सत्कार केला व हा फोटो सुद्धा स्वतःच्या स्टेटसला ठेवला.
एकूणच सर्व प्रकार व त्यांची चर्चा सध्या जोरदार सुरू असून गेल्या आठवड्यातच माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी आपत्कालीन घाट रस्त्याचा विश्वस्त मंडळ मनमानी पद्धतीने वापर करत असल्याची तक्रार सह धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे.
जेजुरी गडाच्या पूर्व दिशेला आपत्कालीन काळात मदत यंत्रणा गडावर पोहोचावी यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे सध्या कच्चा असलेला रस्ता व त्याबाबत २०१८ साली तत्कालीन मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे यांनी सूचना व आचारसंहिता घालून दिली आहे त्यानुसार अतिमहत्वाच्या व्यक्ती म्हणजेच आमदार ,खासदार ,मंत्री ,राज्यमंत्री, राजपत्रित अधिकारी ,दिव्यांग ,अपंग व्यक्ती ,७० वयापुढील जेष्ठ नागरिक यांचेसह आपत्कालीन काळात मदत यंत्रणा व त्यांची वाहने यांनीच हा रस्ता वापरायचा असून सध्या हे नियम धाब्यावर बसवून मनमानी करत विश्वस्त मंडळ यांच्या मर्जीतील पै पाहुणे व मित्रपरिवार यांची वाहने सोडली जात असतात ,यावर निर्बंध घालावेत अशी मागणीही भविकांमधून व ग्रामस्थांकडून होत असते.
देव संस्थान व्यवस्थापक श्री भाटे यांच्याकडे याप्रकाराची चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रमुख विश्वस्त यांच्या सांगण्यावरूनच त्यांना अश्या प्रकारे देवदर्शनाला नेण्यात आल्याचे समजते आहे.