
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील ऐतिहासिक भीम बांधावर गुरुवारी दुर्दैवी घटना घडली. पाण्यात बुडालेल्या महिला पर्यटकाचा मृतदेह तब्बल १८ तासांच्या शोधानंतर शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यात आला. मीना पऱ्हाड (वय ३९ रा. धानिवरी कडूपाडा, डहाणू) असं मृत महिलेचं नाव असून, त्या कुटुंबासह पर्यटनासाठी भीम बांधावर आल्या होत्या.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मीना पऱ्हाड यांनी बांधाच्या वरून थेट पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या काही क्षणांतच खोल पाण्यात ओढल्या गेल्या. घटनेनंतर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि पाणबुड्यांनी शोधमोहीम सुरू ठेवली. शुक्रवारी सकाळी अखेर मृतदेह सापडला असून तो स्वविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
पर्यटनस्थळ, पण सुरक्षा शून्य भीम बांध हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून दररोज येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्यानं हे ठिकाण धोकादायक बनलं आहे. बांधाच्या खाली खोल आणि वेगवान प्रवाह असून अंदाजे ४० ते ५० फूट पाणी असल्याचं स्थानिक सांगतात. तिथे कुठलाही चेतावणी फलक, जीवरक्षक, सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही.
अनेक अपघात, तरीही दुर्लक्ष या अपघातापूर्वीही भीम बांधावर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांच्या बुडून मृत्यूच्या घटना इथे नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अजूनही सुरक्षा यंत्रणा विकसित केलेली नाही. स्थानिक ग्रामस्थांकडून आता जोरदार मागणी करण्यात येत आहे की, या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारली जावी, चेतावणी फलक लावले जावेत, आणि जलरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.
निसर्गसंपन्न ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनानेही अशा लोकप्रिय स्थळांवर जबाबदारीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.