70 जणांच्या बचाव पथकाचं नेतृत्व करणारी मराठमोळी सेनाधिकारी; 31 तासांत बांधला पूल…
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय लष्कराने वायुसेनेच्या मदतीने पाकिस्तानमधील नऊ आतंकवादी तळांचा खात्मा केला.
या ऑपरेशनचं नेतृत्व भारतीय सैन्यातील दोन महिला सेनाधिकाऱ्यांनी केलं. या सेनाधिकारी आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंह यांनी केलं. भारतातील या स्त्री शक्तीचं सध्या देशभरातून कौतुक होतंय.
पण भारतात सोफिया आणि व्योमीका यांच्याप्रमाणेच अनेक महिला सेनाधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने देशाची मान उंचावली आहेत. पण यात एक अशा मराठी महिला सैन्याधिकारी आहेत ज्यांनी केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनावेळी 70 जणांच्या बचावपथकाचं नेतृत्व करत अनेकांचा जीव वाचवला. जाणून घेऊया या रणरागिरीविषयी.
देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या महिला सेनाधिकारी आहेत मेजर सीता शेळके. 2024 मध्ये झालेल्या केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामध्ये चुरलमाला गावाही आपत्तीग्रस्त झालं होतं. यावेळी मेजर सीता शेळके यांनी 70 पुरुष अधिकाऱ्यांच्या टीमचं नेतृत्व करत विक्रमी वेळेत बचावकार्य केलं. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते.
मेजर सीता यांनी बंगळूरूमधील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील 70 पुरुष अधिकाऱ्यांच्या टीमचं नेतृत्व केलं. मेजर शेळके यांच्या टीमने खराब हवामान, उन्मळू पडलेली झाडं आणि नदीच्या पाण्याचा वेग या सगळ्या अडथळ्यांवर मात करत फक्त 31 तासांत पूल बांधण्याचा विक्रम केला. याबद्दल या टीमचं कौतुकही केलं.
मेजर शेळके आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम करत हा पूल बांधला. ज्यामुळे या आपत्तीमध्ये अडकलेल्या अनेक लोकांचे प्राण वाचवता आले तर यामध्ये मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेहसुद्धा जास्त विलंब न करता बाहेर काढता आले.
निवृत्त लेफ्टनंट कर्नल जे एस सोढी यांनी त्यावेळी ट्वि२ट करत सीता यांच्या टीमचं कौतुक केलं होतं. सोशल मीडियावरही सीता यांचे नागरिकांचा बचाव करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं.
सीता या मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगरमधील गाडीलगावच्या रहिवासी आहेत. या आधीही 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये त्यांनी सैन्याच्या एमईजी युनिटचं नेतृत्व केलं होतं. देशभरातून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं.
याबद्दल बोलताना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या स्वतःला लिंगभेदाच्या पलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं. मी स्वतःला फक्त एक महिला मानत नाही; मी एक सैनिक आहे. मी येथे भारतीय सैन्याची प्रतिनिधी म्हणून आहे आणि या प्रक्षेपण पथकाचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे.
मी सर्व स्थानिक अधिकारी, राज्य अधिकारी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. स्थानिक, ग्रामस्थ आणि राज्य अधिकाऱ्यांचे विशेष आभार. असंही त्या म्हणाल्या.
