
जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेले सचिन यादवराव वनंजे हे शहीद झाले आहेत. सचिन हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या तमलूरचे रहिवाशी होते. श्रीनगर जवळील तंगधार परिसरातून त्यांची नियुक्ती असलेल्या पोस्टच्या ठिकाणी ते जात होते.
त्यावेळी सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात ते शहीद झाली. ही दुर्घटना 6 मे ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
शहीद जवान सचिन वनंजे देगलूर तालुक्यातील तमलूर या गावचे मुळ रहिवाशी आहेत. सध्या ते देगलूर येथील फुलेनगरात राहात होते. सचिन यादवराव वनंजे यांचे वय अवघे 29 वर्ष होते. ते 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांची पहिली नियुक्ती ही सियाचीन भागात झाली होती. त्यानंतर पंजाबमधील जालंदरमध्ये ते देशसेवेसाठी तैनात होते.
पंजाबनंतर गेल्या दीड वर्षांपासून ते श्रीनगरमध्ये सेवेत होते. 6 मे रोजी त्यांची पोस्टींग इतर ठिकाणी झाली होती. याच चौकीकडे सैन्य दलाचे वाहन त्यांना घेऊन जात होते. त्यावेळी आठ हजार फूट खोल दरीत त्यांचे वाहन कोसळले. या दुर्घटनेत ते शहीद झाले. त्यांचे लग्न 2022 मध्ये झाले होते. त्यांना 8 महिन्याची मुलगी आहे. शहीद झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
दरम्यान सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर 7 मे रोजी सैन्य दलाच्या विमानाने नांदेडला आणण्यात येणार आहे. अशी माहिती सचिन यांच्या कुटुंबीयां देण्यात आली आहे. जवान सचिन वनंजे यांच्या वीरमरणाने त्यांच्या कुटुंबासहित संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कुपवाडमध्ये पाकिस्तान सीमे जवळ बालाकोत- तंगधार ही पोस्ट आहे. तिथे जातान हा अपघात झाला.