
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप, काँग्रेस, बसपाच्या दहा माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्याचा मोठा गाजावाजा करणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्याच दिवशी तोंडावर आपटली.
दहापैकी पाच नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेशच केला नसल्याचे सांगून आमच्या नावाचा वापर केला असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
आम्ही शिंदे सेनेत प्रवेश केला हे वर्तमानपत्रातील बातम्यांमधूनच आम्हाला कळाल्याचे संबंधित नगरसेवकांनी सांगितले. यावरून शिंदे सेनेच किती अनागोंदी कारभार सुरू आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह एकूण 10 माजी नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता.
प्रवेश केलेल्या काही नगरसेवकांचा फोटोही शिवसेनेच्यावतीने माध्यमांना पाठवण्यात आला होता. काही नगरसेवक व्यस्तता व वैयक्तिक कामांमुळे समारंभाला येऊ शकले नाही, असेही सांगण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पाच नगरसेवकांनी आम्ही शिंदे सेनेत प्रवेशच केला नाही, आमच्याशी कोणी चर्चा केली नाही आणि विचारणाही केली नसल्याचे सांगितले.
परसराम बोकडे, भास्कर बुरडे, भीमराव नंदनवार, जिजा धकाते आणि भाजपच्या माजी नगरसेविका दुर्गा रेहपाडे यांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे शिवसेनेसह राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचीही नाचक्की झाली आहे. जयस्वाल यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी या पक्ष प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.