
अखेर धनंजय मुंडेंची होणार चौकशी; चर्चांना उधाण…
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळं टार्गेट झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचेही आरोप झाले. दरम्यान, जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध व्हायला लागल्यानंतर मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पण आता त्यांची चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. पण नेमकी ही चौकशी काय आहे? कुठे आणि कधी होणार? याबाबत जाणून घेऊयात.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनुसार 16 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता लोकायुक्तांसमोर धनंजय मुंडे यांची चौकशी होणार आहे. या सुनावणीला लोकायुक्तांनी राज्याचे मुख्य सचिव, कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव आणि पोलीस महासंचालक यांनाही बोलावण्यात आलं आहे. लोकायुक्त या सुनावणीत काय निकाल देतात? धनंजय मुंडे दोषी ठरतात का? त्यांना शिक्षा होईल का? याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरपयोग करून निविदा प्रक्रीयेत गैरव्यवहार केल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडं केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली असून त्यानुसार, धनजंय मुंडेंची आता लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.