
तो मी ऐकला असता तर;अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे फक्त राजकारणी म्हणूनच नव्हे तर एक चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. वेळोवेळी ते त्यांची कला दाखवत असतात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचा मुलगा अमित ठाकरे यानेही राजकारणात पाऊल टाकलं.
गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2024) झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही अमित यांनी लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण वडिलांचा राजकारणाचा वारसा अमित यांना मिळाला असला तरी आपण वडिलांप्रमाणे उत्तम चित्रकार काही बनू शकलो नाही, याची सल अमित ठाकरेंच्या मनात आहे. लहान असतानाचा वडिलांनी जो सल्ला दिला होता, त्याचे पालन केले असते तर आपलंही एखादे चित्र प्रदर्शनात झळकलं असतं, अशी खंत अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.
5 मे, जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ‘बोलक्या रेषा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा 2025 व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पद्मश्री अच्युत पालव यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद कांबळे , रीलस्टार अथर्व सुदामे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.अमित ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ज्या मुलांच्या व्यंगचित्रांचे नंबर आले त्यांना बक्षीस देखील देण्यात आलं आहे.
वडिलांनी दिलेला सल्ला मी ऐकला असता तर..
याच वेळी अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनातील भावना व्यक्त केल्या. “या कार्यक्रमाला यावर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आलं, याचा मला अत्यंत आनंद आहे. गेल्या दोन वर्षांपासून घनश्याम देशमुख सरांनी निमंत्रण दिलं होतं, परंतु व्यस्ततेमुळे येता आलं नव्हतं” असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, व्यंगचित्र ही कला तुम्हाला कोणी शिकू देत नाही ही कला तुमच्यात असते किंवा नसते. माझे अनेक मित्र आहे जे ड्रॉईंग शिकले, व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न देखील केला पण त्यांना एक साधी रेषा देखील काढता येत नाही. आज याठिकाणी लहान मुलाचं व्यंगचित्र पाहून खूपच आनंद झाला आहे. आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं.”अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ” मी लहान होतो तेव्हा वडिलांनी ( राज ठाकरे) मला एक सल्ला दिला होता – काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा, दिवसातून एक तास तरी व्यंगचित्र कलेला दे” असं त्यांनी सांगितलं होतं. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही, त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज माझंही एखादं व्यंगचित्र या प्रदर्शनात झळकलं असतं, असं सांगत अमित ठाकरेंनी मनातील सल बोलून दाखवली.
तुमची कला जपा
तुमची ही कला आहे, ती वाया घालवू नका. मला जे माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता तोच मी तुम्हाला देईल की कितीही आयुष्यात व्यस्त झाला , कितीही बिझी असलात तरी दररोज किमान एक तास व्यंगचित्र कलेसाठी द्या, ही कला तुमच्यात आहे आणि ती जपा, असं आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केलं. सोशल मीडियाचा वापर करून ही कला लोकांसमोर आणा, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला.
अमित ठाकरे यांनी सर्व स्पर्धक व आयोजकांचे, विशेषतः संदीप पाचंगे, महेश, धनंजय, आशिष यांचं व विद्यार्थ्यांचे कौतुक करत “हॅट्स ऑफ” म्हटलं. व्यंगचित्र कलेला समाजासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे, असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम कलाकारांप्रती आदर व्यक्त करणारा आणि नवोदित व्यंगचित्रकारांना प्रेरणा देणारा ठरला.