
पंतप्रधान मोदींचे प्रशासनाला
आदेश…
नवी दिल्ली: पाकिस्तानवर लष्करी कारवाई सुरु असताना देशातील प्रशासन मात्र सुरळीत सुरु असणे महत्त्वाचे आहे, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले. प्रशासनातील अत्यंत महत्त्वाच्या २० विभागांच्या सचिवांना पंतप्रधान मोदी यांनी ‘देशातील अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरळीत चालू राहण्यासाठी फुल प्रूफ योजना बनवा’ असे सांगितले.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करण्याची आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. यामुळे बावचळलेल्या पाकिस्तानने गुरुवारी भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने हवाई दल, लष्करानंतर नौदलालाही कारवाईचे आदेश दिले. यामुळे युद्धाची ठिणगी पडली आहे.
अशा परिस्थितीत देशातील जीवनावश्यक सेवा सुविधांचा पुरवठा सुरळीत राहण्याची काळजी घेण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले. विशेषत: जीवनावश्यक असलेल्या वस्तू किंवा सुविधा व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी कोणत्याही आदेशाची वाट पाहत बसू नका व योग्य ते निर्णय घ्या, असेही मोदी यांनी प्रशासनाला सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान, वाणिज्य, पायाभूत सुविधा अशा विविध विभागांच्या सचिवांशी संवाद साधला.
कोणत्याही परिस्थितीत देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार नाहीत आणि अफवांमुळे घाबरून जात साठेबाजीचे प्रकार घडू नयेत, याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचेही आदेश मोदी यांनी दिले आहेत. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाने दोन मिनिटांत आपापली सज्जता आणि योजना सादर केली.