
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शरद पवारांच्या विधानावर रोहित पवारांचे सूचक विधान…
शरद पवार आणि पत्रकारांची अनौपचारिक काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. किंवा कुठलाही आम्हाला संदेश आलेला नाही.
त्यामुळे यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यावर आम्हाला यावर बोलता येईल, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि.८) दिली आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय आता खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीच घ्यावा, असे धक्कादायक विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले होते. यावर रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे.
ते पुढे म्हणाले की, सद्याच्या परिस्थितीत हा विषय थोडा कौटुंबिक आणि भावनिक आहे. कुटुंबाच्या बाबतीत हा थोडासा विषय भारतीय परंपरेमध्ये एकत्र राहणे हे लहानपणापासून शिकवले आहे. त्याला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकत्र आले पाहिजे. आणि दोन्ही पक्ष एकत्र आणायचे असतील तर आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र चर्चा करून निर्णय घेतील. त्यानंतर आम्हाला भूमिका घेता येईल.
शरद पवारांचे वय विचारात घेता त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील आणि सुप्रिया सुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निर्णय घेतील. आणि त्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांचे मत, आमदारांचे मत सुप्रिया सुळे यांना माहीत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार कुठलाही निर्णय घेण्याअगोदर एक अधिकृत पक्षाची बैठक घेतील. सर्वांची मते ऐकूनच निर्णय घेतला जाईल, असे मला वाटते.
मी शरद पवारांना कधीच फोन करत नाही. त्यांचा फोन आला तर मी उत्तर देतो. ते मोठे नेते आहेत, त्यांना फोन करण्यापेक्षा भेटून बोलणे उचित राहील. ते उद्या साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यावेळेस त्यांची भेट घेईल. सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेल्या आहेत. त्यांच्याशी फोनवरून याबाबत चर्चा करेल, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शरद पवार आणि अजित पवार यांना फार जवळून ओळखतात. त्यांनी एकत्र काम केल्यामुळे दोन्ही गट एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली असेल. शेवटी हा पार्टीचा जसा विषय आहे तसा कुटुंबाचा सुद्धा आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे चर्चा करतील. सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.