
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू,७ मे २०२५ रोजी धाकटी डहाणू परिसरात अवकाळी वादळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मच्छीमार बांधवांच्या बोटी, जाळी, मासेमारीसाठीची यंत्रसामग्री यांचे गंभीर नुकसान झाले असून अनेकांचे घरांचे छत उडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
डॉ. सवरा यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त साधनसामग्रीची तपासणी केली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या वेळी बोलताना डॉ. सवरा म्हणाले, “मच्छीमार समाज हा अत्यंत कष्टकरी असून, अशा संकटाच्या वेळी शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सध्याची शासकीय मदत अपुरी असून, तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवरच विशेष आर्थिक पॅकेज जाहीर व्हावे यासाठी मी मुख्यमंत्री व मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “फक्त किनारपट्टीच नव्हे तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील घरांचे आणि शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्या भागांमध्येही तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.”
या दौऱ्यात मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील नागरिकांनी तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.