
आयपीएल २०२५ स्थगित होताच घेतला मोठा निर्णय…
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. या काळात होणारे सर्व सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
बोर्डाच्या या निर्णयानंतर सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने एक मोठे पाऊल उचलले. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने प्रेक्षकांना पैसे परत करण्याची घोषणा केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघ १० मे रोजी हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार होता. पण आता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे हा सामना १० मे तारखेला होणार नाही. त्यामुळे फ्रँचायझी या सामन्याच्या तिकिटाची पूर्ण रक्कम परत करेल. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने काय केली घोषणा?
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या काळात, सर्व फ्रँचायझी मालकांशी बोलल्यानंतर, ९ मे पासून १ आठवड्यासाठी लीग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, एसआरएचने १० मे रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचे पैसे परत करण्याची घोषणा केली. फ्रँचायझीने म्हटले आहे की, “सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, आयपीएल २०२५ स्पर्धा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे तिकिटांच्या परतफेडीची माहिती लवकरच दिली जाईल.
दुसरीकडे, फ्रँचायझीने भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एसआरएचने भारतीय सैन्याला पाठिंबा देऊन त्यांचे कौतुक केले आहे. फ्रँचायझीने म्हटले आहे की, आम्ही अभिमानाने एकत्रित होऊन आमच्या वीरांचा सन्मान करतो आणि भारतीय सशस्त्र दलांच्या अढळ समर्पणाला आम्ही सलाम करतो. जय हिंद.